कोलकाता - रणजी ट्रॉफीत एकीकडे उत्तर प्रदेशच्या उपेंद्र यादवने मुंबईविरूद्ध द्विशतक साजरे केले. तर, बंगालचा फलंदाज मनोज तिवारीने हैदराबादविरूद्धच्या सामन्यात त्रिशतक ठोकले. हैदराबाद विरूद्ध बंगाल या सामन्यात मनोजने हा कारनामा केला आहे. प्रथम श्रेणी कारकीर्दीतील मनोजचे हे पहिले त्रिशतक आहे.
हेही वाचा - १५ ते २० दिवसांसाठी द्रविड घेणार पांड्याचा क्लास!
३०३ धावांच्या या नाबाद खेळीत मनोजने ३० चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्याच्या या कामगिरीमुळे बंगालने पहिल्या डावात हैदराबादसमोर ७ गडी गमावत ६३५ धावांचा डोंगर उभा केला. मध्यम फळीतील फलंदाज अशी ओळख असणाऱ्या मनोजने आपल्या खेळीत एकूण ४१४ चेंडूंचा सामना केला.
२००८ मध्ये मनोज तिवारीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०१५ पर्यंत त्याने एकूण १२ एकदिवसीय सामने खेळले असून त्याने एक शतक आणि एका अर्धशतकासह केवळ २८७ धावा केल्या आहेत. २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध मनोजने अखेरचा सामना खेळला होता.