मुंबई - चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेत, भारतात परतणे पसंद केले. रैनाच्या या तडकाफडकी निर्णयाबाबत विविध चर्चांना ऊत आला. यात सीएसकेचे व्यवस्थापन आणि संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यासोबत रैनाचे वाद झाल्याची चर्चाही होती. पण यावर खुद्द रैनानेच स्पष्टीकरण देत आयपीएलमध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.
एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना रैना म्हणाला, आयपीएलमधून माघारीविषयी सीएसके आणि माझ्यात कोणतीही चर्चा झाली नाही. भारतात परतण्याचा निर्णय हा माझा व्यक्तिगत होता. हा निर्णय माझ्यासाठी खूप वेदनादायी आणि कठीण होती. सीएसके माझा परिवार आहे आणि धोनी माझ्यासाठी सर्व काही आहे. माझ्यात आणि सीएसकेमध्ये कोणतेही वाद नाहीत.
कोणीही ११ करोडहून अधिक रुपये असेच सोडत नाही. यामागे काहीतरी मोठे कारण असू शकते. भलेही मी आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो असेन पण मी अजूनही तरुण आहे आणि पुढील ४ ते ५ वर्ष आयपीएल खेळू शकतो, असेही रैनाने सांगितले.
सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या वक्तव्याबाबत रैना म्हणाला की, श्रीनिवासन हे माझ्या पितासमान आहेत. ते माझ्याकडे आपल्या मुलासारखं पाहतात. त्यांना माझा आयपीएल सोडण्याचे कारण माहीत होते. ते मला आपल्या मुलासारखं रागावू शकतात. आता त्यांना माझ्या निर्णयाबाबत सर्व काही माहीत आहे, ते माझ्या पाठिशी नेहमी राहतात, असेही रैनाने सांगितलं.
दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. स्पर्धेची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. यासाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झाले असून सीएसकेचा संघ वगळता सर्व संघातील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे.
IPL २०२०: सीएसके चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; धोनीसह सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह