रांची - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून धोनी निवृत्ती घेणार असल्याचे निवृत्तीच्या चर्चाही रंगल्या होत्या. धोनीने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आता धोनीचा हॅलिकॉप्टर शॉट क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार नाही. धोनीला 'हेलिकॉप्टर शॉट'चा जनक म्हणून ओळखले जाते. परंतु धोनीच्या या अनोख्या शॉटमागे नक्की कोणाची प्रेरणा आहे? हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.
धोनीला जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट 'फिनिशर' मानला जाते. धोनीचा बालपणीचा मित्र संतोष लालने धोनीला या शॉटविषयी कल्पना दिली. इतकेच नव्हे तर, धोनीला हा शॉट खेळण्यासाठी मदतही केली. धोनी आणि संतोष लहानपणापासूनच एकत्र क्रिकेट खेळत असत. दोघांनीही टेनिस बॉलचा क्रिकेट खेळण्यासाठी वापर केला. संतोषची फलंदाजी पाहणे धोनीला खूप आवडत असे. संतोष धडाकेबाज फलंदाज होता. संतोषकडून हेलिकॉप्टर शॉट शिकण्यासाठी धोनी त्याला गरम समोसे खायला घालत असे.
संतोष आणि धोनी हे लहानपणापासूनच चांगले मित्र होते. दोघांनीही रेल्वेमध्ये एकत्र काम केले आहे. जेव्हा धोनीने संतोषला प्रथम हा शॉट खेळताना पाहिले तेव्हा धोनीने तत्काळ संतोषला या शॉटबद्दल विचारले. संतोषने या शॉटचे वर्णन 'थप्पड शॉट' असे केले.
संतोषच्या स्वादुपिंडाला सूज होती. धोनी जेव्हा टीम इंडियाबरोबर दौऱ्यावर जाणार होता, तेव्हा त्याला संतोषच्या या आजारबद्दल समजले. संतोषला तातडीने रांची येथून दिल्ली येथे नेण्यासाठी धोनीने एअर अँम्ब्युलेंसची व्यवस्था केली. परंतु खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला वाराणसीतच लँड व्हावे लागले. तोपर्यंत संतोषला उशीर झाला होता. वयाच्या 32 व्या वर्षी संतोषचे निधन झाले.
भारताचा 'स्टार' क्रिकेटर झाल्यानंतरही धोनी त्याच्या जुन्या मित्रांसाठी अजिबात बदलला नाही. काही वर्षांपूर्वी कोलकात्यात असाच एक प्रसंग पाहायला मिळाला. धोनीला त्याचा एक जुना मित्र भेटला. हा मित्र स्टेशनवर चहाचे दुकान लावायचा. धोनीने त्याला ओळखले आणि त्याला मोठ्या आनंदाने मिठी मारली. त्यावेळी धोनी विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी कोलकाता येथे गेला होता.
स्टेडियममधून बाहेर पडताना धोनीने एक माणूस ड्रेसिंग रूमच्या बाहेर उभा असल्याचे पाहिले. थॉमस नावाचा हा माणूस धोनीला भेटायला उभा होता. धोनीनेही लगेच त्याला ओळखले आणि मिठी मारली. त्यानंतर तो थॉमसला त्याच्याबरोबर जेवणासाठी हॉटेलमध्ये घेऊन गेला.
धोनीला भेटल्यानंतर खूप आनंदित असलेला थॉमस म्हणाला, “जेव्हा धोनी खडगपूर रेल्वे स्टेशनवर कामाला होता, तेव्हा तो चहा घेण्यासाठी दुकानात येत असे. त्या काळात त्याने माझ्या दुकानात गरम दूधही प्यायले आहे. आता धोनीला भेटल्यानंतर मी माझ्या दुकानाचे नाव 'धोनी टी स्टॉल' ठेवेन.'' खडगपूर रेल्वे स्थानकात थॉमसचे चहाचे दुकान आहे. धोनी जेव्हा या स्टेशनवर टीसीची नोकरी करत होता, तेव्हा तो थॉमसकडे दिवसातून दोन ते तीन वेळा चहा प्यायला जात असे.
धोनी सध्या आपल्या कुटूंबासह रांची येथे राहत आहे. धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळला होता. आता त्याने आंतरराष्ट्रीय किक्रेटमधून निवृत्ती घेतली आहे.