नवी दिल्ली - रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कर्नाटक आणि बंगाल हे दोन संघ २९ फेब्रुवारीला भिडणार आहेत. तत्पूर्वी, कर्नाटक संघाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. कारण, भारताचा सलामीवीर फलंदाज आणि फॉर्मात असलेल्या लोकेश राहुलची कर्नाटक संघात निवड झाली आहे. ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना पार पडेल.
हेही वाचा - मोटेरावर घडलेले 'हे' विक्रम तुम्हाला माहित आहेत का?
राहुल हा भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा भाग असून नुकताच तो न्यूझीलंड दौर्यावरून परतला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत त्याने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. त्याने टी-२० मध्ये २२४ धावा केल्या, तर एकदिवसीय मालिकेत २०४ धावा चोपल्या होत्या.
कर्नाटकने उपांत्यपूर्व सामन्यात जम्मू-काश्मीरचा पराभव केला. या सामन्यात राहुलला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. न्यूझीलंडच्या दौऱ्यावरुन परतलेला मनीष पांडे उपांत्यपूर्व फेरीत खेळला. दुसर्या उपांत्य सामन्यात गेल्या वर्षीच्या उपविजेता सौराष्ट्र संघ गुजरातशी टक्कर घेणार आहे.