नवी दिल्ली - भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाने बाजी मारली. विराटसेनेने ३४७ धावा फलकावर लावूनही न्यूझीलंडने हा सामना ४ गडी राखून सामना जिंकला. रॉस टेलरने नाबाद शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला सलामीवीर हेन्री निकोलस आणि कर्णधार टॉम लाथम यांची साथ लाभली. दरम्यान, भारताच्या पराभवानंतर माजी फिरकीपटू हरभजन सिंगने दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात महत्त्वाचे बदल करण्याचा सल्ला दिला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना हरभजनने सांगितले की, 'कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या फिरकी जोडीला एकत्र संघात संधी मिळायला हवी. कारण न्यूझीलंडचे फलंदाज वेगवान गोलंदाजांचा सामना सहज करतात. पण फिरकी त्यांची दुखरी बाजू आहे. केदार जाधवला संघाबाहेर करून भारताने आणखी एका फिरकीपटूला संधी द्यायला हवी.'
भारतीय संघाने श्रेयस अय्यरचे शतक, कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ५० षटकात ४ बाद ३४७ धावा केल्या होत्या. मात्र, गोलंदाजांनी स्वैर मारा केल्याने न्यूझीलंडला सोपा विजय मिळवता आला. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात २४ वाईड चेंडू टाकले. कुलदीप यादवचा या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला. त्यांनी कुलदीपच्या १० षटकात ८४ धावा झोडपल्या. कुलदीप खालोखाल शार्दुल ठाकूरने ९ षटकात ८० धावा दिल्या.
हेही वाचा - ODI मध्ये सर्वाधिक सामने हरणारे संघ, पाक तिसऱ्या स्थानी तर टीम इंडिया 'या' स्थानावर
हेही वाचा - 'किंग' कोहली : व्यवसायातही सुपरहिट; अक्षय, सलमानसह शाहरुखला टाकले मागे