हैदराबाद - यावर्षी भारत टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. या स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला विजेतेपदासाठी दावेदार मानले जात आहे. मात्र, ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारताला दोन गोष्टींवर काम करावे लागणार असल्याचे मत माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने दिले आहे.
लक्ष्मणच्या म्हणण्यानुसार भारतीय संघाकडे सध्या फिनिशर आणि सामन्याच्या शेवटच्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा (डेथ बॉलर) अभाव आहे. त्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीने जर या दोन प्रश्नांचे निराकरण केले नाही, तर संघाला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.
हेही वाचा - क्रिकेटच्या सामन्यासाठी एका वर्षानंतर स्टेडियममध्ये परतले प्रेक्षक!
एका संकेतस्थळाशी बोलताना लक्ष्मण म्हणाला, ''टी-२० विश्वकरंडकपर्यंत संघातील संतुलन खूप महत्त्वाचे आहे. अशी दोन क्षेत्रे आहेत जिथे टीम इंडिया अजूनही कमकुवत आहे. फिनिशर्समध्ये आपण फक्त हार्दिक पांड्यावर अवलंबून असतो. हार्दिक पांड्याव्यतिरिक्त, या फिनिशरची भूमिका बजावणारे दुसरे कोणीही मला दिसत नाही. तसेच डेथ बॉलर म्हणून बुमराहसोबत टी. नटराजन आणि भुवनेश्वर कुमार नक्कीच आहेत, परंतु गोलंदाजी विभागाच्या या कमतरतेवर लवकरच कोहलीला मात करावी लागेल."
यंदा होणारा टी-२० विश्वकरंडक हा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारतामध्येच होणार आहे. या विश्वकरंडकाचे आयोजन २०२१च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यादरम्यान करण्यात येणार आहे. यात १६ संघ सहभागी होणार आहेत. भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज याव्यतिरीक्त पापुआ न्यू गिनी, नामिबीया, नेदरलँड, ओमान आणि स्कॉटलंड हे संघही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
ऑस्ट्रेलियात २०२० साली होणारा टी-२० विश्वकरंडक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे २०२० ऐवजी २०२२ सालच्या स्पर्धेचे यजमानपद हे ऑस्ट्रेलियाला मिळणार असल्याचे आयसीसीने याआधीच स्पष्ट केले होते.