नवी दिल्ली - टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या सामन्यात द्विशतक ठोकले. मयांकने शतकी खेळीचे रुपांतर द्विशतकी खेळी करत २१५ धावा केल्या. यानंतर भारताचा माजी अनुभवी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने मयांकची तुलना थेट भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागशी केली.
लक्ष्मण म्हणाला की, 'मयांक ताकदवान खेळाडू आहे. घरेलु क्रिकेटमध्ये त्याने ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, त्यावरून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सोपे गेले. स्थिर फलंदाजी आणि चांगली मानसिकता हे त्याचे चांगले गुण आहेत. त्यामुळे तो निडर होऊन सेहवागसारखी खेळी करतो'
लक्ष्मणने मयांकविषयी भाष्य समालोचन करताना केले. यावेळी लक्ष्मणसोबत भारताची फिरकीपटू हरभजन सिंगही उपस्थित होता. हरभजननेही मयांकची स्तुती करताना सांगितले की, 'जेव्हा मयांक क्रिझच्या बाहेर येऊन पायाचा वापर करून फटका मारतो. तेव्हा त्याला पाहण्याची मजा वेगळी असते. तो शानदार पध्दतीने रिव्हर्स स्विपही लगावतो.'
दरम्यान, दक्षिण आफ्रिका विरुध्दच्या सामन्यात मयांक आणि रोहित शर्माने विक्रमी त्रिशतकी सलामी दिली. या सामन्यातील पहिल्या डावात मयांकने २१५ धावांची खेळी केली. यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात आफ्रिकेसमोर ५०२ धावांचे डोंगर उभारत विजयाचा पाया रचला.
हेही वाचा - रोहित शर्माची कसोटी क्रमवारीत मोठी झेप, कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी विराजमान
हेही वाचा - सायनाने शेअर केला आपल्या बायोपिकचा 'फर्स्ट लुक', परिणीतीला दिल्या शुभेच्छा!