ढाका - दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुजनरला अबू धाबी टी-10 लीगमधील बंगाल टायगर्स संघाचा संचालक म्हणून नेमण्यात आले आहे. बंगाल टायगर्सला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ बनवण्यासाठी टीम मॅनेजमेंटने लान्स क्लुजनरची निवड केली आहे, असे बंगाल टायगर्सचे अध्यक्ष मोहम्मद यासीन चौधरी यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
चौधरी पुढे म्हणाले, "क्लुजनरची क्रिकेट कारकीर्द खूप मोठी आहे. त्याच्याकडे अनुभवही खूप आहे. त्यामुळे तो संघाला योग्य दिशेने घेऊन जाईल." बंगाल टायगर्सने पहिल्या हंगामात तिसरे स्थान मिळवले होते.
48 वर्षीय क्लुजनरने दक्षिण आफ्रिकेकडून 49 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 1906 धावा केल्या असून 80 बळी घेतले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 171 सामने खेळले असून 3576 धावा केल्या आहेत. शिवाय त्याने 192 बळीही घेतले आहेत. 2000 मध्ये, त्याची विस्डेन क्रिकेटर म्हणून निवड झाली होती.