ऑकलंड - न्यूझीलंड क्रिकेटने 2020-21 च्या हंगामासाठी आपल्या केंद्रीय करारातील 20 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात फलंदाज डेव्हन कॉनवे, वेगवान गोलंदाज काईल जेमीसन आणि डावखुरा फिरकीपटू एजाज पटेल यांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या कॉलिन मुनरो, जीत रावल आणि टॉड एस्ले यांना या यादीतून वगळण्यात आले आहे.
जेमीसनने यावर्षी भारताविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. शिवाय, तो सामनावीरही ठरला. त्याचबरोबर पटेलचा प्रथम श्रेणीचा आलेखही उत्तम आहे. गेल्या 18 महिन्यात त्याने विदेशी खेळपट्ट्यांवर चांगले प्रदर्शन केले. 28 वर्षीय कॉनवे 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला.
न्यूझीलंड संघाचे निवडक प्रमुख ग्रॅव्हिन लार्सन यांनी सांगितले की, गेल्या 12 महिन्यांत काइल जेमीसन, एजाज पटेल आणि डेव्हन कॉनवे या सर्वांनी खूप प्रभावित केले आहे.
करारातील खेळाडू - टॉम ब्लंडेल, ट्रेंट बाउल्ट, डेव्हन कॉन्वे, कोलिन डेग्रॅन्डहॉलम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, मॅट हेनरी, काईल जेमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, जेम्स नीशम, एजाज पटेल, मिशेल सॅंटनर, इश सोधी, टिम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॅटलिंग, केन विल्यमसन आणि विल यंग.