नवी दिल्ली - भारत सरकारने सोमवारी 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली. त्यानंतर आयपीएल फ्रेंचायझी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सह-मालक नेस वाडिया यांनी चीनी कंपन्यांची प्रायोजकत्व संपवण्याची मागणी केली आहे.
गलवानमधील घटनेनंतर बीसीसीआयला चीनी कंपन्यांच्या प्रायोजकतेचा आढावा घेण्यासाठी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिनची बैठक बोलावायची होती, परंतु अद्याप ही बैठक झालेली नाही. सोमवारी भारताने 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली. देशाच्या हितासाठी आपण आयपीएलमध्ये चीनच्या प्रायोजकांशी असलेले संबंध तोडले पाहिजेत, असे वाडिया यांनी मंगळवारी सांगितले.
''देश प्रथम आहे, पैसा नंतर येतो. ही इंडियन प्रीमियर लीग आहे, चीन प्रीमियर लीग नाही. हो, सुरुवातीला प्रायोजक शोधणे कठीण होईल. पण मला असे वाटते की त्यांची जागा घेणारे पुरेसे भारतीय प्रायोजक आहेत. आपण आपल्यासाठी आपला जीव धोक्यात घालणार्या सैनिकांचा आदर केला पाहिजे,'' असे वाडिया म्हणाले.
गलवान खोऱ्यात 15 जूनला भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत 20 भारतीय जवान शहीद झाले. तर चीनचे 40 पेक्षा जास्त जवान मारले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या घटनेनंतर चीनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत आहे.