दुबई - किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल सध्या आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे खूप ट्रोल होत आहे. मॅक्सवेलची बॅट कधी तळपणार, असा सवाल अनेक चाहते उपस्थित करत आहेत. कर्णधार के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त ख्रिस गेल आणि निकोलस पूरनवर संघ जास्त अवलंबून आहे.
फ्रेंचायझीने मॅक्सवेलवर १०.७५ कोटी रुपये खर्च केले. परंतू त्याला अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आलेली नाही. संघात पर्याय नसल्यामुळे मॅक्सवेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले जात आहे. पॉइंट्स टेबलंध्ये पंजाब चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आज पंजाबचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत एका चाहत्याने सोशल मीडियावर मॅक्सवेलला एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचे मॅक्सवेलनेही विनोदी उत्तर दिले. ''आम्ही तुझ्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करू शकतो का?'', असा प्रश्न एका चाहत्याने मॅक्सीला विचारला.
या प्रश्नावर उत्तर देताना मॅक्सवेल म्हणाला, ''आम्ही आमचे विजयाचे सूत्र का बदलले पाहिजे?'' मॅक्सवेलचे शेवटच्या दहा खेळीत १, ५, १३, ११, ११, ७, १०, ०, ३२ आणि १२ अशा धावा काढल्या आहेत. या कामगिरीनंतरही कर्णधार केएल राहुल आणि टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर विश्वास ठेवला आहे.