कोलंबो - श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि महान कर्णधार कुमार संगकाराने स्वत:ला 'आयसोलेट' करून घेतले आहे. कोरोनामुळे श्रीलंका सरकारने युरोपहून परत आलेल्या नागरिकांनी स्वत:ला आयसोलेट करून घ्यावे, अशा सूचना दिल्या होत्या. संगकाराने सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रोटोकॉल अंतर्गत स्वत: ला वेगळे ठेवले आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू 'आयसोलेशन'मध्ये
संगकाराने एका वृत्तसंस्थेला याविषयी माहिती दिली. 'माझ्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. परंतु मी सरकारच्या निर्देशांचे पालन करत आहे. मी एका आठवड्यापूर्वी लंडनहून आलो होतो', असे संगकाराने म्हटले आहे.
दरम्यान, चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १२ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये याचा फैलाव झाला असून भारतातही ३४१ जणांना याची बाधा झाली आहे. तर देशात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे.