नवी दिल्ली - श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीचे समर्थन केले आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून कठोर विचार आणि अनुभव गांगुलीकडे आहे. त्यामुळे नव्या भूमिकेसाठी तो योग्य दावेदार आहे, असे संगकाराने सांगितले.
मेरिलबोन क्रिकेट क्लबचा (एमसीसी) अध्यक्ष असलेला संगकारा म्हणाला, "मला वाटते सौरव गांगुली बदल घडवून आणू शकेल. मी दादाचा (गांगुली) एक मोठा चाहता आहे, तो फक्त क्रिकेटपटू म्हणून नव्हे, तर तो एक कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला व्यक्ती आहे."
संगकारा म्हणाला, "तुमची मानसिकता आंतरराष्ट्रीय असली पाहिजे आणि तुम्ही कुठून आलात याचा भेदभाव करू नये. जसा मी भारतीय, श्रीलंका, ऑस्ट्रेलियन किंवा इंग्लंडचा आहे. त्याने समजून घेतले पाहिजे, की मी एक क्रिकेटपटू आहे आणि मी जे करतो आहे, ते सर्व क्रिकेट खेळणाऱ्या देशांसाठी सर्वोत्तम आहे.''
तो पुढे म्हणाला, "बीसीसीआय अध्यक्ष होण्यापूर्वीच मी त्याचे काम पाहिले आहे. एमसीसी क्रिकेट समितीमधील त्याचा कार्यकाळ, जगभरातील खेळाडूंशी निर्माण केलेले संबंध, हे पाहिले आहे.''
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हाँगकाँगचे इम्रान ख्वाजा यांना निवडणुकीपर्यंत हंगामी अध्यक्ष केले गेले आहे.