नवी दिल्ली - विराट कोहली हा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणारा फलंदाज असल्याचे मत, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने दिले आहे. क्रिकेटसंबंधित एका कार्यक्रमात ब्रेट लीने हा विश्वास व्यक्त केला.
“आपण येथे एक उत्तम विक्रमाबद्दल बोलत आहोत आणि ज्याप्रमाणे विराटने सात-आठ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत प्रगती केली आहे. त्यामुळे तो निश्चितपणे हे साध्य करू शकतो. परंतु, सचिन तेंडुलकरला कोणी मागे टाकू शकेल असे आपण कसे म्हणू शकता. तो येथे देव आहे, कोणीही देवापेक्षा श्रेष्ठ असू शकतो का? आपण थांबू आणि वाट पाहू. विराट फार तंदुरुस्त आहे. त्याच्याकडे खूप प्रतिभा आहे. शिवाय, तो मानसिकदृष्ट्या बळकट आहे. तो असाच राहिला तर नक्की सचिनच्या पुढे जाऊ शकतो”, असे लीने म्हटले.
ऑस्ट्रेलियाकडून ब्रेट लीने ७६ कसोटी, २२१ एकदिवसीय सामने आणि २० टी-२० खेळले आहेत. तर, नुकताच ४७वा वाढदिवसा साजरा करणाऱ्या सचिनने भारताकडून २०० कसोटी सामने खेळले आहेत. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात त्याने १०० शतके केली आहेत. सचिनने ४६३ एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा केल्या आहेत.