नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचा साथीदार एबी डिव्हिलियर्स यांनी कोरोना व्हायरसविरूद्ध सुरू असलेल्या युद्धासाठी निधी गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन्ही दिग्गजांनी २०१६ च्या आयपीएलमध्ये गुजरात लायन्सविरुद्ध सामन्यात वापरलेल्या क्रिकेट वस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दोघांनी ऐतिहासिक भागीदारी रचली होती.
डिव्हिलियर्सने सोमवारी स्वाक्षरी केलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि जाहीर केले, की या लिलावातील निधी भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कोरोना विरूद्धच्या लढाईत वापरला जाईल. कोहली आणि डिव्हिलियर्सने गुजरातविरूद्ध केलेली २२९ धावांची भागिदारी ही आयपीएलच्या इतिहासातील विक्रमी भागिदारी मानली जाते. दोन्ही फलंदाजांनी शतके ठोकली होती.
“क्रिकेटने मला प्रेमळ आठवणी दिल्या आहेत आणि त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे मी २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध आरसीबीसाठी विराट कोहलीबरोबर केलेली भागीदारी आहे. आयपीएलमधील ही एक अविस्मरणीय रात्र होती. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील प्रेक्षकांना वेड लागले होते. आम्ही दोघांनीही ९६ चेंडूत २२९ धावांची भागीदारी केली. महत्त्वाचे म्हणजे आरसीबीने हा सामना १४४ धावांनी जिंकला होता”, असे डिव्हिलियर्सने आपल्या इंस्टाग्रामवर म्हटले आहे.