दुबई - मुंबई इंडियन्सकडून १० विकेटने पराभूत झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जवर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की आली. याआधी चेन्नई सुपर किंग्जवर अशी वेळ आयपीएल इतिहासात कधीही आलेली नव्हती. कारण, चेन्नईचा पराभव १० गडी राखून कोणालाही करता आलेला नव्हता. दरम्यान, युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात काही घटना पहिल्यादांच घडल्या आहेत. कोणत्या घटना आहेत, त्या वाचा...
चेन्नईचा संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर -
चेन्नईचा संघ आयपीएलमध्ये बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. पण ते या सुरू असलेल्या हंगामात गुणतालिकेत तळाशी म्हणजे आठव्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचे प्ले ऑफची दारे जवळपास बंद झाली आहेत. चेन्नईचा संघ ११ सामन्यात फक्त तीन विजयासह ६ गुणांची कमाई करू शकला आहे.
चेन्नईचा पहिल्यादांच १० गड्यांनी लाजीरवाणा पराभव -
आयपीएल इतिहासात पहिल्यादांच चेन्नईचा मोठा पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात, तीन वेळा विजेता असलेल्या चेन्नई संघ १० गड्यांनी पराभूत झाला आहे.
बॅक टू बॅक दोन शतकं-
दिल्ली कॅपिटल्सचा डावखुरा फलंदाज शिखर धवनने सलग दोन सामन्यात दोन शतकं झळकावली आहेत. असा कारनामा आयपीएल इतिहासात कोणत्याही फलंदाजाला यापूर्वी करता आलेला नाही. हा विक्रम शिखरच्या नावे जमा झाला आहे.
शतके करण्यात भारतीयांचा बोलबाला -
आयपीएलच्या तेराव्या हंगामात तीन भारतीय फलंदाजांनी शतकं झळकावली आहेत. पंजाबचे केएल राहुल आणि मयांक अग्रवाल, दिल्लीचा शिखर धवन यांनी शतक झळकावली आहेत. अद्याप कोणत्याही विदेशी खेळाडूला शतक झळकावता आलेले नाही.
एका सामन्यात गोलंदाजांने दोन षटकं टाकली मेडन -
रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एका सामन्यात दोन षटकं निर्धाव टाकली. त्याने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात हा कारनामा केला. सिराजने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी केली. यात त्याने २ षटके निर्धाव तर राहिलेल्या दोन षटकात ८ धावा देत ३ गडी बाद केले.
सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम -
युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाजीचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज एनरिच नार्खिया याने १५६.२२ किलोमीटर वेगाने चेंडू फेकला. हा आतापर्यंत आयपीएल इतिहासामधील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे.
एका दिवसात तीन सुपर ओव्हर -
आयपीएलच्या इतिहासात एका दिवसात झालेल्या दोन सामन्यामध्ये तीन सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यात कोलकाता विरूद्ध हैदराबाद हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी दुसरा सामना मुंबई विरूद्ध पंजाब यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. हा सामना सुपर ओव्हरमध्ये देखील टाय झाला. यामुळे आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात आली.