सिडनी - आयपीएलच्या २०२० हंगामाला सुरुवात होण्यासाठी जवळपास दोन महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. सर्व फ्रेंचायझींनी या हंगामाची जोरदार तयारी सुरू केली आहे. पण, आयपीएल सुरू होण्याच्या आधीच शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने, आयपीएल २०२० लिलावात बोली लावून नव्याने संघात दाखल करून घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस ग्रीनची गोलंदाजाची शैली अवैध ठरली आहे आणि त्याच्यावर ९० दिवस गोलंदाजी न करण्याची शिक्षा सुनावली आहे. आयपीएललाही तो मुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ग्रीन सध्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या गोलंदाजीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ९० दिवसांची बंदी घातली आहे. यामुळे ग्रीनच्या आयपीएल समावेशावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला २० लाख रुपयांची बोली लावून संघात घेतले आहे.
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२० लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्ससाठी सर्वाधिक १५.५० कोटीची बोली लावली आणि संघात सामिल करुन घेतले. कमिन्ससह कोलकाताने इयॉन मॉर्गन (५.२५ कोटी), वरुण चक्रवर्थी (४ कोटी), टॉम बँटन (१ कोटी), राहुल त्रिपाठी (६० लाख), एम सिद्धार्थ (२० लाख), ख्रिस ग्रीन (२० लाख), प्रविण तांबे (२० लाख) आणि निखिल नाईक (२० लाख) यांना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे.
हेही वाचा - ICC Test Ranking : विराटसह स्टिव्ह स्मिथला १४ कसोटी खेळणाऱ्या लाबुशेनचा धोका
हेही वाचा - बिग बॅश लीगमध्ये एका दिवसात गोलंदाजांनी साधली दोन वेळा हॅट्ट्र्रिक, पाहा व्हिडिओ