नवी दिल्ली - टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर विंडीजच्या संघात मोठा बदल घडून आला आहे. अष्टपैलू खेळाडू कायरान पोलार्डला विंडीजच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार आहे.
विंडीजच्या एका वृत्तपत्राने याविषयी माहिती दिली. गोलंदाज जेसन होल्डरकडून एकदिवसीय तर, कार्लोस ब्रेथवेटकडून टी-२० संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. विंडीजच्या क्रिकेट मंडळाने (सीडब्ल्यूआय) हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - US OPEN FINAL: नदाल भावा तुच रे...पटकावले १९ वे ग्रॅंडस्लॅम
वृत्तानुसार, निवड समितीसमोर पोलार्डच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामध्ये सहा सदस्यांनी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले तर, सहा सदस्यांनी मतदान केले नाही. २०१६ मध्ये पोलार्डने आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत विंडीजच्या राखीव संघामध्ये पोलार्डचा समावेश केला होता.
नुकत्याच खेळल्या गेलेल्या भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत पोलार्डने चांगले प्रदर्शन केले होते. येत्या नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध विंडीज क्रिकेट मालिका खेळणार आहे. या संघांमध्ये तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि एक कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.