लंडन - हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने दिमाखदार विजय नोंदवला. कर्णधार विराट कोहलीच्या खेळीमुळे भारताला हा विजय सहज साकारता आला. त्याने केलेल्या नाबाद ९४ धावांच्या खेळीवर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन चांगलाच खूष झाला आहे.
हेही वाचा - बास्केटबॉलपटू सतनाम सिंगचे निलंबन!
हा सामना संपल्यानंतर विराटने त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने 'मालिकेची सुरूवात चांगली झाली. या विजयापासून सकारात्मकता मिळेल', असे कॅप्शन दिले होते. या फोटोवर पीटरसनने आपली प्रतिक्रिया दिली असून 'भावा!.. तो फटका जबरदस्त होता', अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. भारतीय कर्णधार विराट कोहली या सामन्यात विडींजसाठी कर्दनकाळ ठरला. त्याने या सामन्यात विंडीज गोलंदाजांची पळता भुई केली. या खेळीमुळे विराटवर कौतुकाचा वर्षावही झाला. या सामन्यात विराट कोहलीने ५० चेंडूत नाबाद ९४ धावांची खेळी केली. दरम्यान, उभय संघात दुसरा टी-२० सामना तिरुवनंतपुरम आज (८ डिसेंबर) रंगणार आहे.