वेलिंग्टन - न्यूझीलंड क्रिकेटचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात २०१९ या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये, चांगली कामगिरी केल्याने, केन विल्यमसनला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. विल्यमसन मागील सात वर्षांपासून हा पुरस्कार जिंकत आहे. रॉस टेलर आणि सोफी डिवाइन हे अनुक्रमे पुरुष आणि महिला टी-२० क्रिकेटचे सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले. महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये, सूझी बेट्स सर्वश्रेष्ट खेळाडू ठरली.
कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदा हे पुरस्कार ऑनलाईनच्या माध्यामातून देण्यात आले. विल्यमसनने २०१९ या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्याच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड संघ इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. विल्यमसनने विश्वकरंडक स्पर्धेत दोन शतकांसह ५७८ धावा केला. तो विश्वकरंडक स्पर्धेचा सर्वश्रेष्ट खेळाडू ठरला.
न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी, विल्यमसनने विश्वकरंडक स्पर्धेत केलेली कामगिरी पाहता तो या पुरस्कारासाठी दावेदार होता, असे सांगितले. अनुभवी रॉस टेलरने टी-२० मध्ये २०१९ वर्षात १३० स्ट्राईक रेटने ३३० धावा केल्या आहेत. सूझी बेट्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकं झळकावली. तर सोफीने महिला टी-२० क्रिकेटमध्ये व्यक्तिगत पहिलं शतकं केलं. याशिवाय तिने ७१ च्या सरासरीने ४२९ धावा केल्या आहेत.
हेही वाचा - क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा वार्षिक करार : लाबुशेन 'इन' तर ख्वाजा 'आऊट', वाचा संपूर्ण लिस्ट
हेही वाचा - गेल पाठोपाठ रसेलने सीपीएलच्या फ्रँचायझीवर केले गंभीर आरोप, म्हणाला...