कोलकाता - 2020 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सध्या खेळाडूंचे लिलाव सुरू आहेत. लिलावाचे आत्तापर्यंतचे चित्र पाहता हा हंगाम चांगलाच रंगतदार होणार असे दिसते. किंग्स इलेवन पंजाबने आपला सगळा जोर लावून दर्जेदार खेळाडू आपल्या संघात दाखल करून घेतले आहेत. तेराव्या हंगामासाठी पंजाब संघाच्या कर्णधारपदाची धुरा के. एल. राहुलकडे देण्यात आली आहे. किंग्स इलेवन पंजाबचे सहमालक नेस वाडीया यांनी याबाबत अधीकृत घोषणा केली.
पंजाबचे कर्णधारपद कोण भूषवणार याबाबत अनेक शक्यता वर्तवण्यात येत होत्या. लिलावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला किंग्स इलेवन पंजाबने 10 कोटी 75 लाख इतकी घसघशीत रक्कम मोजून खरेदी केले. त्यामुळे मॅक्सवेलला कर्णधार पद मिळेल, असेही म्हटले जात होते. मात्र, नेस वाडीया यांनी केलेल्या घोषणेनंतर सर्व चर्चांना विराम मिळाला आहे.
हेही वाचा - आयपीएलच्या तेराव्या हंगामातील सर्वात महागडा अष्टपैलू खेळाडू
कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर केएल राहुलने पंजाब संघाचे मालक आणि संघ व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. त्यापूर्वी किंग्स इलेवन पंजाबने वसीम जाफर यांना आपला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. माजी फिरकीपटू अनिल कुंबळे पंजाबचे मुख्य प्रशिक्षक आहेत.