नवी दिल्ली - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मागच्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात वर्णद्वेषी वक्तव्याचा बळी ठरला होता. आता आर्चरला पुन्हा एकदा वर्णद्वेषी टिपण्णीला सामोरे जावे लागले आहे. बार्बाडोसच्या या वेगवान गोलंदाजाने त्याला मिळालेल्या या वागणूकीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
हेही वाचा - रांची गाठताच धोनीने केली 'बाईक-सवारी'...पाहा व्हिडिओ
एका व्यक्तीने आर्चरच्या पोस्टवर वर्णद्वेषी टिपण्णी केली. या टिपण्णीचा 'स्क्रीनशॉट' आर्चरने शेअर केला आहे. 'यावर प्रतिक्रिया देण्याबाबत मी खूप विचार केला. मला आशा आहे की यासारख्या गोष्टींचा नियमितपणे कोणालाही सामना करावा लागणार नाही. पण लोकं असे का वागतात हे मला समजत नाही', असे आर्चरने या स्क्रीनशॉटसोबत म्हटले आहे.
वर्णद्वेषी वक्तव्याला बळी ठरण्याची आर्चरची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात आर्चरला अशा पद्धतीच्या वक्तव्याला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आर्चरने कारवाई करण्याची मागणी केली होती. ज्याने हे कृत्य केले होते त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती.
या व्यक्तीवर न्यूझीलंडमध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. बे ओव्हल मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड या उभय संघात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी हे प्रकरण झाले होते. त्यानंतर ऑकलंड येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती.