नवी दिल्ली - अॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरने टाकलेला वेगवान बाऊन्सर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथच्या मानेवर आदळला होता. यात त्याला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. स्मिथला दुखापत झाल्यानंतर आर्चर त्याची विचारपूस न करता हसत थांबला. यामुळे आर्चरवर क्रिकेट चाहत्यांसह खेळाडूंनी टीका केली होती. आता या प्रकरणी भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याने प्रतिक्रिया दिली आहे.
सेहवाग म्हणाला, 'फलंदाजी करताना तुम्ही तुमची मान गोलंदाजांपुढे आणताच कशाला? डोक्यावर हेल्मेट आहे आणि हातात बॅट आहे. चेंडूवर तुटून पडा. त्याला पूर्ण ताकदीनिशी टोलवा'. असा सल्ला त्याने दिला आहे.
भारतीय खेळाडू विरेंद्र सेहवाग याची ओळख विरोधी गोलंदाजावर तुटून पडणारा फलंदाज अशी आहे. त्याने अनेक सामन्यात विरोधी गोलंदाजांची खरपूस समाचार घेतला आहे. तुमच्या हातामध्ये जर बॅट असेल तर तुम्हा घाबरता कशाला. त्याचा वापर करा आणि गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूला कुशलतेने सीमारेषेबाहेर टोलवा. असे सेहवाग म्हणाला.
विरेंद्र सेहवागने १०४ कसोटी सामने खेळली असून यात त्याने ४९.३४ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या आहेत. यात तब्बल सहा वेळा २०० पार धावा त्याने एकट्याने केल्या आहेत. त्याची कसोटीची सर्वोच्च धावसंख्या ३१९ असून या धावा त्याने पाकिस्तानविरुध्द सामन्यात ठोकल्या होत्या. २५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३५.०६ च्या सरासरीने ८२७३ धावा केल्या आहेत. यात १ द्विशतक,१५ शतके आणि ३८ अर्धशतकाचा समावेश आहे.
सेहवागने १९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यामध्ये २१.८९ च्या सरासरीने ३९४ धावा केल्या आहेत. मी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही चेस्ट पॅड (छातीचे पॅड) लावलेले नाही, असेही सेहवाग म्हणाला.