कराची - काही दिवसांपूर्वी पाकिस्तान भारतापेक्षा अधिक सुरक्षित असल्याची, मुक्ताफळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मनी यांनी उधळली होती. मनी यांच्यानंतर पाकचा माजी कर्णधार रशीद लतीफने बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांची चार देशांच्या प्रस्तावित स्पर्धेची कल्पना फ्लॉप असल्याची टीका केली होती. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादने 'आयसीसीने भारतावर बहिष्कार घालावा', असे म्हटले आहे.
हेही वाचा - जाणून घ्या.. नवीन वर्षासाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक
एका मुलाखतीमध्ये मियांदादने हे वक्तव्य केले . 'भारतात हिंसाचार वाढला असून कश्मीरी व मुस्लींमांना भेदाची वागणूक मिळत आहे. भारतात आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे भारत हा आता सुरक्षित देश राहिलेला नाही. सर्व देशांनी भारताचा दौरा करू नये आणि आयसीसीला माझी हिच विनंती आहे. श्रीलंका देश नुकताच पाक दौऱ्यावर आला होता. त्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही कमी ठेवलेली नव्हती. सर्वजण आनंदाने परत गेले. मात्र, भारतात जनावरासारखे लोकांना मारले जात आहे. त्यामुळे आयसीसीने भारतावर बहिष्कार घालावा', अशी मागणी मियांदादने केली आहे.
पाकिस्तानमध्ये कसोटी खेळण्यास बांगलादेशने नकार दिल्यानंतर पाकिस्तान पेचात सापडला आहे. बांगलादेशचे दिवंगत नेते शेख मुजीबुर रेहमान यांच्या जयंतीनिमीत्त, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आशिया इलेव्हन आणि विश्व इलेव्हन यांच्यात २ सामन्यांची टी-२० मालिका आयोजित केली आहे. यात पाकिस्तानी खेळाडू या मालिकेत नसतील, तरच भारतीय खेळाडू सहभागी होतील, असा पवित्रा बीसीसीआयने घेतला आहे.