दुबई - विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा एलिमिनेटर सामन्यात ६ गडी राखून पराभव केल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा आत्मविश्वास वाढला आहे. ते या विजयासह क्वालिफायर फेरीसाठी पात्र ठरले आहेत. अशात हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरने, आम्हाला प्रयत्न सुरू ठेवायचंय कारण, आम्ही अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी एक पाऊल दूर आहोत. ते पाऊल टाकताच आम्ही अंतिम फेरीत असू, अशी प्रतिक्रिया दिली.
हैदराबादच्या विजयात जेसन होल्डरने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने या सामन्यात गोलंदाजीत ४ षटकात २५ धावा देत तीन गडी बाद केले. यात विराट कोहलीला त्याने अवघ्या ६ धावांवर माघारी पाठवले. यानंतर त्याने फलंदाजीत संघ अडचणीत असताना, नाबाद २४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे हैदराबादची पडझड झाली नाही. दुसरीकडे केन विल्यमसनने बाजू लावून धरत नाबाद ५० धावांची खेळी साकारत विजयावर शिक्कामोर्तब केले.
होल्डरची प्रतिक्रिया..
सामना संपल्यानंतर होल्डर म्हणाला, आम्ही बलाढ्य संघातील मोठे खेळाडू पाहून खेळत नाही. परिस्थितीनुसार आम्ही आतापर्यंत खेळ केला आहे. खास करून आमची फलंदाजी आक्रमक ठरली आहे. वॉर्नरने संघाचे नेतृत्व योग्य पद्धतीने हाताळले असून त्याने फलंदाजीत आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. शिवाय रिद्धिमान साहाला देखील त्याने सपोर्ट केला आहे. मनिष पांडे आणि केन विल्यमसन यांनी मधली फळी समर्थपणे सांभाळली आहे. आमचा संघ संतुलीत संघ आहे.
आम्ही योग्य वेळी लयीत आलो आहोत. संघातील सर्व खेळाडूंनी परिस्थिती ओळखून त्यांना मिळालेल्या संधीत जबाबदारीने खेळ केला आहे. आम्हाला प्रयत्न सुरू ठेवायचंय, आम्ही अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी एक पाऊल दूर आहोत. ते पाऊल टाकताच आम्ही अंतिम फेरीत असू, असेही होल्डरने सांगितले.
हेही वाचा - IPL २०२० : RCB विरुद्ध विजय मिळवल्यानंतर वॉर्नर म्हणाला....
हेही वाचा - IPL २०२० : 'या'मुळे आमचा पराभव झाला; स्पर्धेबाहेर पडलेल्या विराटची कबुली