चेन्नई - भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी नोंदवणारा इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन याला दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात येऊ शकते. याचे संकेत इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी दिले आहेत.
अँडरसनने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात धारधार गोलंदाजी केली. त्याने एका षटकात शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेला त्रिफाळाचित केले. संपूर्ण सामन्यात अँडरसनने पाच विकेट घेतल्या. आता दुसऱ्या कसोटीत त्याला विश्रांती देण्यात येऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. याचे संकेत खुद्द इंग्लंडचे प्रशिक्षक सिल्वरवुड यांनीच दिले आहेत.
सिल्वरवुड माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'मी विजेत्या संघात बदल करू इच्छित नाही. कारण सर्वांनी चांगली कामगिरी केली. अँडरसनने देखील आपले योगदान दिले. पण आम्ही आणखी वाट पाहत आहोत, पाहू पुढे काय घडतं.'
मी अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या जोडीला खेळवू इच्छित आहे. दोघेही सद्या चांगल्या फॉर्मात आहेत. पण सद्य परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल. आमच्याकडे अनेक गोलंदाज आहेत. त्यामुळे आम्ही सामन्यात कोणालाही ऐनवेळी संधी देऊ शकतो, असे देखील सिल्वरवुड म्हणाले.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. इंग्लंडने या मालिकेतील पहिला सामना जिंकून १-० ने आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसऱ्या सामन्याला चेन्नईमध्येच १३ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - Australian Open : बार्टीचा विजय; सोफिया केनिनचे आव्हान संपुष्टात