जळगाव - प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महत्त्वाची समजली जाणारी रणजी क्रिकेट स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेत जळगावच्या शशांक विनायक अत्तरदे या अष्टपैलू खेळाडूने चमकदार कामगिरी करत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले आहे. मुंबई संघाकडून खेळणाऱ्या शशांकने कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावांत ९ बळी टिपले. या सामन्यात कर्नाटकने मुंबईचा ५ गडी राखून पराभव केला. मात्र, शशांकची कामगिरी कर्नाटकच्या विजयापेक्षा 'भाव खाऊन' गेली.
शशांक अत्तरदे याचे कुटुंब मूळचे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील साळवा गावचे. मात्र, नोकरीनिमित्ताने त्याचे आजोबा जळगावात स्थायिक झाले होते. तेव्हापासून अत्तरदे कुटुंबीयांचे ऋणानुबंध जळगावशी जुळले. त्याचे वडील विनायक अत्तरदे हे एका खासगी कंपनीत लेखा विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत होते. दीड वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. तर आई नंदिनी या शहरातील नंदिनीबाई बेंडाळे मुलींच्या महाविद्यालयात वाणिज्य विभागात प्राध्यापक म्हणून सेवारत आहेत. शशांकला एक विवाहित मोठा भाऊ असून तो पत्नीसह पुण्याचे स्थायिक आहे. आता जळगावात त्याची आई आणि आजी दोघी राहतात.
शशांकच्या कुटुंबात खेळाला महत्त्व आहे. त्याची आई लहानपणी उत्तम कबड्डीपटू होत्या. तर काका देखील क्रिकेट, खो-खो यासारख्या खेळांमध्ये पारंगत होते. आई आणि काकांनीच शशांकला लहानपणापासून क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिले. त्यातूनच शशांकवर क्रिकेटचे संस्कार घडले. आजवरच्या क्रिकेट प्रवासात त्याने जे काही यश मिळवले आहे, त्यात कुटुंबीयांचाच मोठा वाटा राहिला आहे.
मुंबईत खेळवण्यात आलेल्या रणजी स्पर्धेतील कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात शशांकने पहिल्या डावात १९ षटकात ५८ धावा देत ५ बळी टिपले. तर दुसऱ्या डावात १० षटकात ५२ धावा देत ४ बळी टिपले. दोन्ही डाव मिळून त्याने कर्नाटक संघाचे ९ बळी टिपले.
शशांकने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करावं -
शशांकचा आजवरचा क्रिकेट प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. क्रिकेटप्रती त्याची असलेली जिद्द पाहता तो यापुढेही यश मिळवेल, यात शंका नाही. शशांकने भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करावं, हीच आपली अपेक्षा असल्याची भावना त्याची आई नंदिनीने 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
लहानपणापासून शशांकला क्रिकेटची आवड होती. त्याला सिरीयल पाहणं आवडत नसे. तो तासनतास क्रिकेटचे सामने पाहत असे. नंतर तो गल्ली क्रिकेट खेळू लागला. पुढे वयाच्या ११ ते १२ व्या वर्षी म्हणजेच इयत्ता पाचवीत असताना तो तेथील शाळेकडून थेट तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला. या नंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.
नूतन महाविद्यालयात असताना तो जैन स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी झाला. या काळात जिल्हास्तरावर त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या. उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याने अनेक आंतरराष्ट्रीय तसेच विद्यापीठास्तरीय स्पर्धांमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून लक्षवेधी कामगिरी केली.
उजव्या हाताचा फलंदाज आणि फिरकी गोलंदाज म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केल्यानंतर गेल्या वर्षी त्याची कर्नाटकच्या बंगळुरूत झालेल्या प्रथम श्रेणी रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई संघात निवड झाली. सद्या सुरू असलेली रणजी स्पर्धा ही त्याची करियरची दुसरी रणजी स्पर्धा आहे.
शशांक अभ्यासातही हुशारच -
क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू असलेला शशांक लहानपणापासून अभ्यासातही हुशारच होता. प्रत्येक इयत्तेत त्याने आपली टक्केवारी ८० ते ९० च्या दरम्यान राखली. शशांकची क्रिकेटची गोडी ओळखून त्याच्या आईने त्याला प्रोत्साहन दिले. पुढे क्रिकेटमध्येच करियर करायचं ठरवल्यानंतर शशांकने स्वतःला क्रिकेटसाठी वाहून घेतले.
माध्यमिक शिक्षण घेत असताना क्रिकेटमुळे शशांकचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याच्या आईने जाणीवपूर्वक त्याला विज्ञान शाखेऐवजी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत प्रॅक्टिकलमुळे विद्यार्थ्यांना फारसा वेळ मिळत नाही. वाणिज्य शाखेत तशी अडचण नसते. शशांकला क्रिकेटला जास्तीत जास्त वेळ देता यावा, हा त्याच्या आईचा त्यामागचा उद्देश होता. क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत शशांकने आईचा उद्देश सार्थ ठरवला.