नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिसने आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. आज सकाळी केकेआरच्या व्यवस्थापनाने याला दुजोरा दिला. कॅलिससह अन्य सपोर्ट स्टाफनेही केकेआर संघाची साथ सोडली आहे.
जॅक कॅलिससह सहाय्यक प्रशिक्षक सायमन कॅटिचनेही आपल्या पदाचा राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस २०११ मध्ये खेळाडू म्हणून केकेआर संघामध्ये सामिल झाला होता. त्यानंतर काही वर्षानंतर त्याची नेमणूक संघाचे प्रशिक्षकपदावर करण्यात आली. तो मागील ९ वर्षापासून केकेआरसोबत जोडला गेलेला होता.
केकेआरने प्रथम २०१२ साली आयपीएल स्पर्धा जिंकली. त्यावेळी जॅक कॅलिसने संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. त्याने स्पर्धेत ४०० धावा आणि १५ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर केकेआरचा संघ पुन्हा एकदा चॅम्पियन ठरला.
जॅक कॅलिसने राजीनामा दिल्यानंतर केकेआरचे सीईओ वँकी मैसूर यांनी कॅलिसने संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी कॅलिसच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कॅलिसचे आभारही मानले आहे.