मुंबई - कोरोना लढ्यात मदतनिधी उभारण्यासाठी, भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका खेळवण्याचा प्रस्ताव ठेवणाऱ्या माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरला कपिल देवच्या पाठोपाठ आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने सुनावले. दोन्ही देशांच्या दरम्यान क्रिकेट खेळायचे की नाही याचा निर्णय अख्तर नाही तर सरकारचा असल्याचे सांगत मदन लाल यांनी अख्तरला फटकारले आहे.
शोएब अख्तरने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात ३ मालिका खेळण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या सामन्यातून निर्माण होणारा निधी कोरोनाच्या लढ्यात वापरता येईल, असे त्याने म्हटले होते. यावर भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताला पैशाची गरज नाही, अशा शब्दात शोएबला सुनावले होते.
त्यानंतर माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी देखील शोएबला फटकारले आहे. त्यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचे की नाही याबाबतचा निर्णय भारत सरकारचा आहे. जोपर्यंत सरकार सांगत नाही तोपर्यंत बीसीसीआय पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार नाही, असे सांगितले.
पुढे बोलताना मदन लाल म्हणाले, शोएबने दिलेला प्रस्ताव भविष्यात देखील उपयोगी पडणार नाही. पुढील काही महिने आपल्याला कोरोनाशी लढायचे आहे. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्याआधी बाकीच्या गोष्टींचा विचार करावा लागेल'
दरम्यान, आआधी कपिल देव यांनीही भारताला कोरोनाशी लढण्यासाठी पैशांची नसल्याचे सांगत शोएबच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे.
हेही वाचा - VIDEO : अॅशेसमधील सर्वोत्कृष्ठ झेल, पाहा फक्त साडेतीन मिनिटात अन् तेही एका क्लिकवर...
हेही वाचा - आवडीचा आहार एकदाच करायचा, भारतीय खेळाडूंच्या फिटनेसवर अॅपद्वारे नजर