मुंबई - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. यामुळे रोजंदारी कामगार व गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा घटकांसाठी क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यात २०१८ सालच्या युवा विश्वकरंडक विजेत्या संघाच्या खेळाडूचीही भर पडली आहे. युवा गोलंदाज इशान पोरेलने पंतप्रधान सहाय्यता निधीत आर्थिक मदत करण्याबरोबरच १०० गरीबांची जबाबदारी घेतली आहे.
मूळचा बंगालचा असलेल्या इशान २०१८ च्या युवा विश्वकरंडक ( १९ वर्षांखालील) विजेत्या संघाचा सदस्य आहे. त्याने स्थानिक गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्धार केला आहे. त्याच्या या निर्धारात त्याचे कुटुंबीयही सहभागी आहेत. त्याने कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करायला हवे, असे म्हटले आहे.
इशानने पंतप्रधान सहायता निधीला २० हजार, बंगाल मुख्यमंत्री सहायता निधीला २० तर स्थानिक रुग्णालयाला १० अशी एकूण ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
इशान म्हणाला, 'प्रत्येकाने आपापल्या परीने गरजूंना मदत करायला हवी. मी माझ्याकडून मदत करत आहे. त्याशिवाय मी येथील गरीब कुटुंबांना जेवण पुरवण्याचं काम करत आहे. पुढील दोन दिवस माझ्या आई-वडिलांसह मी या कुटुंबांना अन्न पुरवणार आहोत.'
इशान व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, मेरी कोम, मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, पूनम यादव, दीप्ती शर्मा यांनी आर्थिक मदत केली आहे.
दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ४७ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशभरामध्ये गेल्या १२ तासात तब्बल १३१ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ९६५ वर पोहोचली आहे.
सलामीवीर मयांकवर 'आचारी' बनण्याची वेळ, BCCI ने शेअर केला व्हिडिओ
क्रिकेट विश्वाला डकवर्थ-लुईस नियम देणाऱ्या टोनी लुईस यांचे निधन