नवी दिल्ली - विराट कोहली हा भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडू शकतो, असे भाकित माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केले आहे. विराट आपली क्षमता आणि तंदुरूस्तीच्या बळावर हे साध्य करू शकतो, असेही त्याने सांगितले.
इरफान म्हणाला, विराटने अल्पावधीत खूप कामगिरी केली आहे. मला आशा आहे, की १०० शतकांचा विक्रम मोडणारा खेळाडू भारतीय असावा. विराटकडे या विक्रमाकडे पोहोचण्याची क्षमता व तंदुरुस्ती आहे. मला वाटते की त्या १०० आकड्यापेक्षा विराट ३० शतके मागे आहे. आशा आहे की निवृत्ती घेण्यापूर्वी तो हे साध्य करेल. हे लक्ष्य त्याच्या डोक्यात असेल."
३१ वर्षीय कोहलीने आतापर्यंत ७० आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. त्याने २४८ एकदिवसीय सामन्यात ४३ शतके आणि ८६ कसोटीत २३ शतके केली आहेत. सचिनने कसोटीत ५१ शतके आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके ठोकली आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौर्यावर विराटच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.