मुंबई - कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन वर्षभरासाठी स्थगित करण्यात आल्याचे आयओसीने जाहीर केले. यानंतर आता इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा हंगाम रद्द करण्यासाठी बीसीसीआयवर सारखा दबाव येत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे भारतात २१ दिवसांसाठी संचारबंदी लावण्यात आली आहे. सर्व परिस्थिती पाहता आयपीएल रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयपीएलच्या १३ हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार होती. पण कोरोनाच्या वाढलेल्या धोक्यामुळे बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांनी स्पर्धेचे आयोजन परिस्थिती सुधारल्यानंतरच होऊ शकेल, अशी घोषणाही त्यावेळी केली होती. त्यानंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी चिघळली.
भारतात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ही संख्या आता ५०० च्यावर गेली आहे. तर १० जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. ही गंभीर स्थिती पाहता आयपीएलच्या आयोजनाबाबत माझ्याकडेही कुठला उपाय नसल्याचे, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. तर किंग्स इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांनी या मुद्दावर, बीसीसीआयने आता आयपीएलचा विचार सोडून द्यायला हवा. मुख्य क्रीडा आयोजक या नात्याने आम्ही जबाबदारीचे भान राखायला हवे, असे स्पष्ट मत मांडले होते.
याविषयावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं की, 'मागील १० दिवसात काहीही बदलले नाही. सद्यस्थिती कायम असल्याने आयपीएल आयोजनाबाबत माझ्याकडे काहीच उत्तर नाही.'
दरम्यान, कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे बीसीसीआयने मंगळवारी आयोजित संघ मालकांसोबतची व्हिडिओ कॉन्सफरन्सव्दारे होणारी बैठक स्थगित केली. यानंतर बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने, यंदा आयपीएलचे आयोजन दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - Corona Virus : आयओसीच्या ऑलिम्पिक पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत, पण...
हेही वाचा - कोरोना लॉकडाऊन: गरजूंच्या मदतीसाठी धावला सौरव गांगुली, दिली मोठी मदत