चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. कोलकाताचे फलंदाज विरुद्ध हैदराबादचे गोलंदाज अशी ही लढत आहे. दोन्ही संघ चेपॉक स्टेडियममध्ये विजय मिळवून स्पर्धेची सुरूवात करण्यास इच्छुक आहेत. या लढतीत दोन्ही संघांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
युएईमध्ये झालेल्या मागील हंगामाच्या मध्यावरच दिनेश कार्तिककडून कोलकाताच्या नेतृत्वाची धुरा मॉर्गनकडे सोपवण्यात आली होती. कोलकाता, हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिन्ही संघांच्या खात्यावर गतवर्षी सारखेच गुण जमा होते. यापैकी हैदराबाद आणि बंगळुरुने सरस धावगतीच्या बळावर आगेकूच केली, तर सलग दुसऱ्यांदा कोलकाताचा संघ बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला. आजच्या सामन्यात कोलकाता संघाची मदार शुबमन गिल, कर्णधार इयॉन मॉर्गन, शाकिब अल हसन आणि आंद्रे रसेल यांच्या कामगिरीवर असेल.
दुसरीकडे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार परतल्यामुळे हैदराबादचे सामर्थ वाढले आहे. गतवर्षी चार सामने खेळल्यानंतर भुवनेश्वरला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, जॉनी बेयरस्टो यांच्यासह मनिष पांडे याच्या कामगिरीवर हैदराबाद संघाची धुरा आहे. हैदराबादकडे राशिद खानच्या रुपाने हुकमी एक्का आहे.
कोलकाता नाईट रायडर्स -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुबमन गिल, नितीश राणा, टिम सेफर्ट, गुरकीरत, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वारियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोडा, हरभजन सिंह, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.
सनरायजर्स हैदराबाद -
डेविड वार्नर (कर्णधार), केन विल्यमसन, विराट सिंह, मनीष पांडे, प्रियम गर्ग, ऋधिमान साहा, जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, केदार जाधव, जे सुचित, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कॉल, बासिल थम्पी, शाहबाज नदीम आणि मुजीब उर रहमान.
हेही वाचा - IPL २०२१ : कोलकाता हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोणत्या ४ विदेशी खेळाडूंसह मैदानात उतरणार
हेही वाचा - IPL २०२१: धोनीला दुहेरी धक्का; सामना तर गमावलाच सोबत झाला दंडही