मुंबई - लग्नासाठी ब्रेक घेतलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या मैदानावर लवकरच पाहायला मिळणार आहे. तो या महिन्याच्या शेवटी मुंबई इंडियन्स संघात सामिल होणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीचे तीन सामने बुमराह खेळला. त्यानंतर त्याने लग्नासाठी टी-२० मालिकेतून माघार घेतली. आता तो एकदिवसीय मालिका खेळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण तो या महिन्याच्या अखेरीस आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या संघात सामिल होणार आहे.
जसप्रीत बुमराह अँकर संजना गणेशन हिच्यासोबत सोमवारी विवाहबंधनात अडकला. गोव्यात जवळच्या नातेवाईक आणि खास मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. लग्नाच्या ब्रेकनंतर बुमराह आता २६ ते २८ मार्च दरम्यान मुंबई इंडियन्स संघामध्ये दाखल होईल. बुमराहला चेन्नईला जाण्यापूर्वी एक आठवड्यासाठी क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
दरम्यान, आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा उद्घाटनाचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईत खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी बुमराह व्यतिरिक्त संघातील अन्य भारतीय सदस्य थेट सामन्याचे स्थळ गाठणार आहेत. हे खेळाडू आधीच बायो बबलमध्ये होते. त्यामुळे ते आयपीएल खेळण्यासाठी थेट आपापल्या संघात सामिल होतील.
हेही वाचा - महिला क्रिकेट: पराभवाची मालिका सुरूच, पाचव्या वनडेत अफ्रिकेचा भारतावर ५ गडी राखून विजय
हेही वाचा - ICC T२० Rankings : कोहलीला 'विराट' कामगिरीचे बक्षिस, राहुलला फटका