नवी दिल्ली - बहुप्रतीक्षित इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सुरुवात 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होऊ शकते. तर, स्पर्धेचा अंतिम सामना 8 नोव्हेंबरला होईल. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी एका वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली.
आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल पुढील आठवड्यात बैठक घेऊन या स्पर्धेचा अंतिम निर्णय घेणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फ्रेंचायझींना आपली योजना कळवल्याची माहिती मिळाली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "आयपीएल 19 सप्टेंबर (शनिवार) पासून सुरू होईल आणि अंतिम फेरी 8 नोव्हेंबरला (रविवारी) होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे, ही स्पर्धा 51 दिवस चालेल. फ्रेंचायजी आणि ब्रॉडकास्टर्सव्यतिरिक्त इतर भागधारकांना ते अनुकूल ठरेल.''
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलला गेल्यामुळे आयपीएलचा मार्ग मोकळा झाला. यंदाचे आयपीएल 26 सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी चर्चा होती. मात्र, ही स्पर्धा या तारखेच्या आठवडाभरापूर्वी व्हावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे, जेणेकरुन भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर परिणाम होऊ नये.
या अधिकाऱ्याने सांगितले, "ऑस्ट्रेलियन सरकारच्या नियमांनुसार भारतीय संघाला 14 दिवस वेगळे रहावे लागेल. या 51-दिवसीय वेळापत्रकाबाबत चांगली गोष्ट म्हणजे एका दिवसात दोन सामने आयोजित केले जातील. सात आठवड्यांपर्यंत ही स्पर्धा चालू असल्याने आम्ही पाच दिवसात प्रत्येकी दोन सामने आयोजित करण्याच्या विचारात आहोत. प्रत्येक संघाला सराव करण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागेल आणि अशा परिस्थितीत 20 ऑगस्टपर्यंत फ्रेंचायझी मैदानात पोहोचतील. त्यांना तयारीसाठी चार आठवड्यांचा कालावधी देण्यात येईल.''