दुबई - चेन्नईचा मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचे नाबाद अर्धशतक आणि अंबाटी रायुडूच्या ३९ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा ८ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या चिवट अर्धशतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूला २० षटकात ६ बाद १४५ धावांपर्यंत मजल मारता आली. पण सलामीवीर ऋतुराजने मैदानात अखेरपर्यंत तळ ठोकत ख्रिस मॉरिसला षटकार खेचत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या १४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने ५.१ षटकात ४६ धावांची सलामी दिली. ख्रिस मॉरिसने डु प्लेसिसला २५ धावांवर बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. त्याने डु प्लेसिसला सिराजकडे झेल देण्यास भाग पाडले.
अंबाटी रायुडू आणि गायकवाड यांनी चेन्नईचा डाव पुढे नेला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ५० चेंडूत ६७ धावांची भागीदारी रचली. चहलने डावाच्या १४व्या षटकात रायुडूचा त्रिफाळा उडवला. रायुडूने २७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावांची खेळी केली. यानंतर ऋतुराजने आपले अर्धशतक पूर्ण केले. गायकवाडने धोनीसह चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गायकवाडने ५१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. तर धोनी १९ धावांवर नाबाद राहिला. ख्रिस मॉरिस आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा फिंच-पडीक्कल जोडीने आश्वासक सुरूवात करून दिली. दोघांनी ३.५ षटकात ३१ धावांची सलामी दिली. सॅम करनने फिंचला बाद करत बंगळुरूला पहिला धक्का दिला. १५ धावांवर ऋतुराज गायकवाडने फिंचचा झेल घेतला. यानंतर पडीक्कलही (२२) माघारी परतला. त्याला सँटनरने ऋतुराजकडे झेल देण्यास भाग पाडले.
तेव्हा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या जोडीने मोर्चा सांभाळला. दोघांनी ६८ चेंडूत ८२ धावांची भागीदारी केली. १५व्या षटकात दोघांनी संघाचे शतक धावफलकावर लावले. पण, दीपक चहरला मोठा फटका मारण्याच्या नादात डिव्हिलियर्स बाद झाला. त्याने ३९ धावा केल्या. डिव्हिलियर्सचा झेल सीमारेषेवर डु प्लेसिसने घेतला. यानंतर मोईन अली अवघ्या एक धाव करत माघारी परतला. त्याला सॅम करनने सँटनर करवी झेलबाद केले.
विराटने एक बाजू पकडून ठेवत आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. विराटने ४३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह ५० धावा केल्या. धावगती वाढवण्यासाठी विराटने फटकेबाजीचा प्रयत्न केला. तेव्हा उडालेला झेल डु प्लेसिसने टिपला. विराट बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी अखेर बंगळुरूला १४५ धावांची मजल मारून दिली. चेन्नईकडून सॅम करनने ३ तर दीपक चहरने दोन गडी बाद केले. सँटनरने एका फलंदाजाला तंबूत धाडले.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ -
ऋतुराज गायकवाड, फाफ ड्यु प्लेसिस, अंबाटी रायुडू, एन. जगदीशन, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सॅम करन, रविंद्र जडेजा, मिचेल सॅटनर, दीपक चहर, इम्रान ताहीर आणि मानु कुमार.
रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा संघ -
देवदत्त पडीक्कल, अॅरोन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, गुरूकिरत सिंग मान, ख्रिस मॉरिस, वॉशिग्टन सुंदर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.