नवी दिल्ली - आयपीएल २०२०चा हंगाम अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. १३व्या हंगामातील आता फक्त दोन सामने शिल्लक राहित आहेत. मुंबई इंडियन्सने दिल्लीचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. तर दुसरीकडे दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे. दरम्यान, आयपीएल विजेत्या आणि इतर तीन संघांना यंदा बक्षीस म्हणून दिल्या जाणाऱ्या रक्कमेत कपात करण्यात आली आहे. वाचा, प्ले ऑफमध्ये पोहोचणाऱ्या संघासोबतच आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला मिळणाऱ्या बक्षिसाबद्दल...
यंदाच्या आयपीएलला विजेत्या संघाला कोविड-१९ चा फटका बसणार आहे. मार्च महिन्यात बीसीसीआयने आयपीएलच्या बक्षिसाच्या रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार आता आयपीएलच्या विजेत्यास मागील वर्षाच्या तुलनेत ५० टक्के रक्कम बक्षीस म्हणून मिळेल. मार्च महिन्यात बीसीसीआयने कोरोना व्हायरसमुळे कठोर कपात करण्याचा उपाय केला होता. बीसीसीआयने मार्च महिन्यातच सर्व फ्रेचाँयझींना पत्र पाठवून याबाबत माहिती दिलेली आहे.
विजेत्याना किती मिळणार रक्कम -
बीसीसीआयच्या परिपत्रकानुसार तब्बल २० कोटीऐवजी यंदा २०२० चॅम्पियन संघाला आता फक्त १० कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. उपविजेत्यांना यंदा १२.५ कोटींऐवजी ६.२५ कोटी रक्कम मिळणार आहे. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघाला यंदाच्या हंगामात ४.३ कोटी रुपये मिळणार आहेत.
दरम्यान, आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेतील विजेत्यांना मिळणारी ही रक्कम कमी वाटत आहे. कारण, लिलाव प्रक्रियेत खेळाडूंनाच १५ ते १७ कोटी रुपयांना विकत घेतले जात किंवा रिटेन केले जाते.