मुंबई - कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पावसाळा संपेपर्यंत सुधारण्याची आम्हाला आशा आहे. म्हणून आम्ही पावसाळ्यानंतर आयपीएलच्या आयोजनाचा विचार करत आहोत, अशी माहिती बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी दिली आहे.
आयएएनएस वृत्तसंस्थेने नुकतेच बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने 25 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या काळात आयपीएल 2020चे आयोजन करण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त दिले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नियोजित असलेली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा लांबणीवर टाकण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे या काळात आयपीएल स्पर्धा खेळवली जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या कार्यकारिणीचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. गायकवाड यांच्या प्रतिक्रियेनंतर बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी महत्वपूर्ण अपडेट दिली आहे.
राहुल जोहरी यांनी एका वेबिनारमध्ये सांगितले की, 'जेव्हा विमानसेवा सुरू होईल तेव्हा, स्पर्धा सुरू होण्याआधी प्रत्येकाला स्वत:ला क्वारंटाईन करावे लागेल. प्रत्येक खेळाडूचे वेळापत्रक कसे आहे, याची माहिती घेऊन त्यावर विचार करण्यात येईल. आम्ही सारे खूप आशावादी आहोत. आम्ही आशा करतो की पावसाळा संपेपर्यंत परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. म्हणून आम्ही पावसाळ्यानंतर आयपीएलच्या 13व्या हंगामाचे आयोजन करण्याचा विचार करत आहोत.'
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने 29 एप्रिलपासून नियोजित असलेली आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. याशिवाय बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धाही रद्द केल्या आहेत. जर यंदा आयपीएल 13 रद्द झाल्यास बीसीसीआयला 4000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे बीसीसीआय आयपीएल आयोजनाबाबत सर्व शक्यतांची चाचपणी करत आहे.
हेही वाचा - पत्नीसाठी काय पण..! विराट अनुष्कासाठी बनला डायनॉसोर, पाहा मजेशीर व्हिडिओ
हेही वाचा - करिअरच्या सुरूवातीला 'या' गोलंदाजाला खेळणं कठीण ठरलं - विराट