दुबई - आयपीएल २०२०मध्ये शनिवारी डबल हेडरमध्ये दोन सामने खेळवण्यात आले. यात पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला. हा सामना आरसीबीने ८ गडी राखून जिंकला आणि गुणातालिकेत अव्वलस्थान काबिज केले. या सामन्यानंतर काही तासांतच दिल्लीने केकेआरवर विजय मिळवत अव्वलस्थान पटकावले. शनिवारी झालेल्या दिल्ली आणि केकेआर या सामन्यानंतर गुणातालिकेत कोणते बदल झाले पाहा...
दिल्ली आणि केकेआर या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ गुणातालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांमध्ये दिल्लीने दोन विजय मिळवले होते. त्यामुळे ते तिसऱ्या स्थानावर होते. पण या सामन्यात त्यांनी केकेआरवर विजय मिळवला आणि अव्वलस्थान पटकावले. त्याआधी आरसीबीने राजस्थानवर विजय मिळवत अव्वलस्थान काबिज केले होते. पण त्याचे अव्वलस्थान हे काही तासांपुरतेच ठरले. दिल्ली आणि आरसीबी या दोन्ही संघांचे सध्याच्या घडीला समान सहा गुण आहेत. पण दिल्लीचा रनरेट हा आरसीबीपेक्षा चांगला आहे, यामुळे ते अव्वलस्थानी आहेत.
दिल्ली विरुद्धच्या सामन्यापूर्वी केकेआरचा संघ चौथ्या स्थानावर होता. कारण केकेआरला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दोन्ही सामन्यांत त्यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे तीन सामन्यांतील दोन विजयांसह त्यांचे चार गुण झाले होते. या सामन्यात केकेआरला पराभव पत्करावा लागला. या पराभवासह केकेआरची गुणतालिकेत घसरण झाली असून ते पाचव्या स्थानावर घसरले आहेत.
सध्याच्या घडीला गुणातालिकेत अव्वल स्थानावर दिल्ली आहे. त्यानंतर दुसरे स्थान आरसीबीने पटकावले आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आहेत. पाचव्या स्थानावर केकेआर आहे. तर सहाव्या आणि सातव्या स्थानावर अनुक्रमे राजस्थान आणि पंजाब आहे. धोनीचा चेन्नई संघ तळाशी म्हणजे, आठव्या स्थानावर आहे.