दुबई - आयपीएलच्या १३व्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात हैदराबादने मुंबईचा १० गडी राखून पराभव करत दिमाखात प्ले ऑफची फेरी गाठली. या सामन्याअंती स्पर्धेतील टॉप-४ संघ फिक्स झाले. गुणतालिकेत १८ गुणांसह मुंबईने अव्वलस्थान कायम राखले. दिल्लीने १६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. तर बंगळुरू आणि हैदराबाद आणि कोलकाताचे समान १४ गुण झाले. पण नेट रनरेटच्या आधारावर हैदराबादने तिसरे तर बंगळुरूने चौथे स्थान पटकावले. आता प्ले ऑफमध्ये विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या कसे आहे प्ले ऑफचे वेळापत्रक आणि कोणता संघ कोणत्या संघाशी भिडणार ते...
असे आहे प्ले-ऑफचे वेळापत्रक -
- ५ नोव्हेंबर - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - पहिला पात्रता फेरी सामना - दुबई
- ६ नोव्हेंबर - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - बाद फेरीचा सामना - अबु धाबी
- ८ नोव्हेंबर - मुंबई-दिल्ली सामन्यातील पराभूत संघ विरुद्ध हैदराबाद-बंगळुरू सामन्याचा विजेता - दुसरी पात्रता फेरीतील सामना - अबुधाबी
- १० नोव्हेंबर - मुंबई दिल्ली सामन्याचा विजेता विरुद्ध दुसऱ्या पात्रता फेरीतील विजेता - अंतिम सामना दुबई
असा रंगला सामना -
नाणेफेक जिंकून हैदराबादने मुंबईला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. अष्टपैलू क्रिकेटपटू केरॉन पोलार्डची झुंजार खेळी आणि सूर्यकुमार यादवच्या बहुमूल्य योगदानाच्या जोरावर मुंबईने हैदराबादपुढे विजयासठी १५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना, सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी अभेद्य भागिदारी रचत सनरायझर्स हैदराबादला विजय मिळवून दिला. या विजयासह हैदराबादने प्ले ऑफचे तिकीट मिळवले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या अनुपस्थितीचा फटका मुंबईला बसला.
हेही वाचा - SRH vs MI : मुंबईचा लाजिरवाणा पराभव, हैदराबाद प्लेऑफसाठी पात्र
हेही वाचा - ....तर रोहित ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो - गांगुली