शारजाह - किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर मयांक अग्रवालने आयपीएलमध्ये 'ऑरेंज कॅप' कायम राखली आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडून 'पर्पल कॅप' आपल्याकडे घेतली आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.
अबुधाबीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध चहलने २४ धावा देऊन ३ बळी घेतले. चहलकडे आता ४ सामन्यांत ८ बळी आहेत. चहलशिवाय शमी आणि दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाच्या ८ विकेट्स आहेत. चांगली सरासरी आणि इकॉनॉमीमुळे चहल यादीत अव्वल आहे.
दरम्यान, मयांकचे ४ सामन्यात २४६ धावा झाल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो प्रथम क्रमांकावर आहे. राहुलला मुंबईविरुद्ध १६ धावा करता आल्या. त्याने एकूण २१९ धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटलने चार सामन्यांमधून ६ गुणांसह गुणतालिकेध्ये अव्वल स्थान मिळवले. शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सचा १८ धावांनी पराभव केला. दिल्लीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर दुसर्या, मुंबई इंडियन्स तिसर्या आणि सनरायझर्स हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे.