दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात बुधवारपर्यंत २१ सामने पार पडले आहेत. आज २२ वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगणार आहे. दरम्यान, या हंगामात आतापर्यंत अजिंक्य रहाणेसह अनेक गुणवान खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली नाही. ते अजूनही राखीव खेळाडू म्हणून बेंचवर बसून आहेत. अशात चेन्नई सुपर किंग्ज, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद यांना आणखी चांगल्या खेळाडूंची गरज आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींमध्ये मिड सिझन ट्रान्सफरची (Mid Season Transfer) ची चर्चा सुरु झाली आहे. काय आहे मीड सेशन ट्रान्सफर सुविधा, वाचा...
एखाद्या स्पर्धेचा हंगाम मध्यावर आल्यानंतर दोन प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या परवानगीने खेळाडूला विश्वासात घेऊन खेळाडूंची देवाण-घेवाण करु शकतात. त्याला मिड सिझन ट्रान्सफर असे म्हटले जाते. आयपीएलच्या बाराव्या हंगामात गव्हर्निंग काऊन्सिलने अनकॅप्ड प्लेअरसाठी (Uncapped Player) मिड सिझन ट्रान्सफरची सोय केली होती. पण मुंबई इंडियन्सचा अपवाद वगळता एकही संघ यासाठी पुढे आला नव्हता. दरम्यान, यंदाच्या हंगामात देखील गव्हर्निंग काऊन्सिलने याची सोय केली आहे. त्यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमात बसणारे खेळाडू या ट्रान्सफरसाठी पात्र ठरु शकणार आहेत.
मिड सिझन ट्रान्सफरची काय आहे नियमवली आणि कोणते खेळाडू ठरू शकतात पात्र -
- यात सर्वात महत्वाचा नियम असा आहे की, मिड सिझन ट्रान्सफरचा कालावधी सुरु होईपर्यंत जर एखाद्या खेळाडूने दोन पेक्षा जास्त सामने खेळले नसतील तर अशाच खेळाडूंची देवाण-घेवाण करण्यात येऊ शकते.
- प्रत्येक संघाला आपले पहिले ७ सामने झाल्यानंतरच मिड सिझन ट्रान्सफरची सुविधा घेता येईल.
- मिड सिझन ट्रान्सफरमध्ये खेळाडूची देवाण-घेवाण करण्यासाठी लागणारे पैसे हे ऑक्शन पर्सबाहेरुन द्यावे लागणार आहेत.
- मिड सिझन ट्रान्सफरमध्ये दोन्ही संघांचे एकमत आणि खेळाडूची सहमती असणे गरजेचे आहे.
- मिड सिझन ट्रान्सफरमध्ये खेळाडूला त्याची लिलावात ठरवली गेलेली रक्कम मिळेल, याव्यतिरीक्त त्याला कोणताही फायदा मिळणार नाही.
- मिड सिझन ट्रान्सफरसाठी भारतीय असो किंवा परदेशी, सर्व खेळाडू उपलब्ध असणार आहेत.
दरम्यान, मिड सिझन ट्रान्सफर ही संकल्पना इंग्लिश प्रिमीअर लीग आणि युरोपियन फुटबॉल स्पर्धांमध्ये राबवण्यात आली आहे. अनेक मान्यवर संघ या सुविधेचा फायदा घेत संघात नवीन खेळाडूंना जागा देतात. यंदाच्या हंगामात चेन्नई, हैदराबाद आणि पंजाबचे संघ या सुविधेतून नवीन खेळाडूंशी करार करू शकतात.