नवी दिल्ली - आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने जोरदार टीका केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या योग्यतेचा नव्हता, असे गंभीरने म्हटलं आहे.
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूला २० षटकांत केवळ १३१ धावाच करता आल्या. त्यानंतर केन विल्यमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने हा सामना सहा विकेट्सनी जिंकला. बंगळुरूच्या पराभवाबाबत गंभीर म्हणाला की, तुम्ही विराटच्या संघाचा कितीही बचाव केला तरी माझ्या मतानुसार आरसीबीचा संघ प्ले ऑफमध्ये जाण्याच्या योग्यतेचा नव्हता.
बंगळुरूचा संघ फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला. गोलंदाजांनी थोडीफार चांगली कामगिरी केली. जर नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराजसारखे गोलंदाज शेवटची दोन षटके टाकत असतील आणि तुम्हाला १८-१९ धावांचा बचाव करायचा असेल ते सुद्धा जागतिक दर्जाच्या फलंदाजासमोर तर ते कठीण आहे, असे गंभीर म्हणाला.
असा रंगला सामना -
बंगळुरुने हैदराबादला १३२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान विल्यमसन-होल्डर या जोडीने संयमी फलंदाजी करत पूर्ण केले. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. त्याला होल्डरने नाबाद २४ धावा करत मोलाची साथ दिली.
हेही वाचा - IPL २०२० : विराटला कर्णधारपदावरून हटवण्याची आली वेळ; दिग्गजाचे मत
हेही वाचा - IPL २०२० : RCB विरुद्ध विजय मिळवल्यानंतर वॉर्नर म्हणाला....