मुंबई - इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया १९ डिसेंबरला कोलकातामध्ये पार पडली. या लिलावात सर्व संघांनी आपल्या आवडीच्या खेळाडूंची खरेदी केली. पण आता आयपीएलच्या तारखेवरुन सर्वच संघांची चिंता वाढली आहे. आयपीएल प्रशासकीय समिती आणि फ्रँचायझी यांच्यात आयपीएलच्या तारखेवरून वाद सुरू झाला आहे. या संदर्भातील वृत्त एका इंग्रजी संकेतस्थळाने दिले आहे.
इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, बीसीसीआयला इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा हंगाम २८ मार्च २०२० पासून सुरू करायचा आहे. मात्र, याच कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि इंग्लंड व श्रीलंका यांच्यात २ सामन्यांच्या कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे जर या कालावधीत स्पर्धा खेळवण्यात आली तर या ४ देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये सामिल होणार नाहीत.
अद्याप स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झालेले नाही. पण आयपीएल प्रशासकीय समिती जुन्या वेळापत्रकानुसार म्हणजेच एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्राची सुरुवात करेल, अशी आशा आयपीएलमधील एका फ्रेंचायझीच्या वरिष्ठ अधिका-याने व्यक्त केली आहे.
तर दुसऱ्या फ्रँचायझी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड टी-२० मालिका २९ मार्चला संपणार आहे, तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी सामना ३१ मार्चपर्यंत खेळवण्यात येईल. अशा परिस्थितीत आपल्या मोठ्या खेळाडूंशिवाय स्पर्धा सुरू करणे धोक्याचे ठरेल. यामुळे १३ वा हंगाम १ एप्रिलपासून सुरु केल्यास, सोईस्कर होईल.'
हेही वाचा - टीम इंडियाला धक्का, दीपक चहरची संघात वापसी कठीण
हेही वाचा - पाकिस्तान भारतापेक्षा सुरक्षित, पीसीबी अध्यक्ष एहसान मनी यांची मुक्ताफळे