मुंबई - भारतात वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आयपीएलचा १३ वा हंगाम यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेची सुरूवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. यासाठी सर्व संघ, यूएईमध्ये दाखल झाले आहेत. अशात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्पर्धेच्या पहिल्या काही सामने मुकणार होते. पण त्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने आपल्या प्रोटोकॉलमध्ये बदल केला. यामुळे ते खेळाडू आता पहिल्या सामन्यापासून संघात दिसण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने कोरोनाच्या संसर्गामुळे कडक नियमावली जाहीर केली आहे. यात त्यांनी प्रत्येक खेळाडूंची तसेच संघ व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. याशिवाय खेळाडूंना जैव सुरक्षित बबल सोडून बाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. सद्या यूएईला पोहोचलेले खेळाडू बीसीसीआयच्या प्रोटोकॉल प्रमाणे क्वारंटाइन आहेत. पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडूंना क्वारंटाइन व्हावं लागणार नाही. बीसीसीआयने आपल्या प्रोटोकॉलमध्ये त्या खेळाडूंसाठी तसा बदल केला आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सप्टेंबर महिन्यात तीन सामन्याची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी खेळाडूंना आधीच क्वारंटाइन करण्यात येणार आहे. ही मालिका आटपून हे खेळाडू थेट यूएई गाठणार आहेत. या कारणाने त्यांना पुन्हा क्वारंटाइन केलं जाणार नाही. उभय संघातील मालिकेचा अखेरचा सामना १६ सप्टेंबला होईल, यानंतर खेळाडू यूएईकडे प्रयाण करतील.
या विषयी राजस्थान रॉयल्स संघाचे सीईओ जॅक लुश मॅक्रम यांनी सांगितले की, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पहिल्या सामन्यापासून संघात दिसण्याची शक्यता आहे. कारण बीसीसीआयने आपला प्रोटोकॉल नियमात बदल केला आहे. ते खेळाडू क्वारंटाइन होणार नाहीत. टी-२० दौरा आटपून ते खेळाडू थेट आयपीएल खेळण्यासाठी रवाना होतील.
हेही वाचा - धोनी अन् रोहित शर्माचे फॅन्स उसाच्या शेतात भिडले, सेहवाग म्हणतो...
हेही वाचा - IPL २०२० : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 'हा' हुकमी एक्का सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार