आबुधाबी - सनरायजर्झ हैदराबाद संघाने मंगळवारी शेख झायेद स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. हैदराबादने हा सामना १५ धावांनी जिंकत आयपीएल २०२० मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. हैदराबादच्या विजयानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने, डेथ ओव्हरमध्ये आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली असल्याची प्रतिक्रिया दिली.
सामना संपल्यानंतर वॉर्नर म्हणाला, डेथ ओव्हरमध्ये आमच्या गोलंदाजांनी चांगली मेहनत घेतली. शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी फलंदाजांना बाद करत धावांवर वेसण घातले. यामुळे आम्हाला विजय साकारता आला. गोलंदाजांचे हे प्रदर्शन पाहून मी खुश आहे.
फलंदाजीविषयी बोलताना वॉर्नर म्हणाला, आम्हाला सुरुवातीला वेगाने धावा जमवणे कठिण जात होते. चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नसल्याने, चौकार-षटकार टोलावता येत नव्हते. तेव्हा आम्ही पळून धावा काढण्यावर भर दिला. यामुळे विरोधी संघावर दडपण आले.
दरम्यान, हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना जॉनी बेअरस्टो (५३), डेव्हिड वॉर्नर (४५) आणि केन विल्यमसन (४१) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीचा संघ निर्धारीत २० षटकात ७ बाद १४७ धावा करु शकला. राशिद खानने ४ षटकात १४ धावा देत ३ गडी टिपले. भुवनेश्वर कुमारने २ तर खलील अहमद आणि टी नटरराजन यांनी १-१ गडी बाद केला.
हेही वाचा - दिवंगत आई-वडिलांच्या आठवणीने राशिद खान भावुक; सामनावीरचा पुरस्कार केला समर्पित
हेही वाचा - IPL 2020 : सुसाट राजस्थानची विजयी घोडदौड रोखण्याचे कोलकातापुढे आव्हान