मुंबई - वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आयपीएलच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर ३७ धावांनी विजय मिळविला. ऋषभ पंतने ७८ धावांची स्फोटक खेळी केल्यामुळे दिल्लीने २० षटकात मुंबई समोर विजयासाठी २१४ धावांचे आव्हान दिले होते. २१४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरेल्या मुंबईला १९.२ षटकात ९ बाद १७६ धावा करता आल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम मुंबई इंडियन्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंतने मुंबईची गोलंदाजी चांगलीच फोडून काढत आयपीएलमधील ९ वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने २७ चेंडूत ७८ धावा केल्या. त्यात ४ चौके आणि ७ षटकारांचा समावेश होता. यंदा दिल्लीकडून खेळणाऱ्या शिखरने ४३ तर कोलिन इनग्रामने ४७ धावाचे योगदान दिले. पृथ्वी शॉ लवकर परतला. मुंबई कडून मिचेल मॅक्लेघन ने ३ , जसप्रीत बुमराह, बेन कटिंग आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. डीकॉक आणि रोहितने ३३ धावांची सलामी दिली. त्यानंतर सूर्यकुमार यादव, हर्दिक पंड्या आणि रोहित शर्मा हे स्वस्तात माघारी परतले. कृणाल पंड्याने आक्रमक ३२ धावांची खेळी केली. सिक्सर किंग युवराज सिंगने ३४ चेंडूत ५३ धावा केल्या.