हैदराबाद - आयपीएलचा महासंग्राम आता शेवटच्या टप्प्यात आली असून १२ मे ला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्याचा थरारा हा हैदारबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार असून या सामन्याची सर्व तिकिटे चक्क २ मिनिटात विकली गेली आहेत. त्यामुळे तिकीट विक्रीत काहीतरी झोल असल्याच्या प्रतिक्रिया क्रिकेट चाहत्यांमधून उमटत आहेत.
अंतिम सामन्यासाठी तिकीट विक्री करण्यापूर्वी बीसीसीआयकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. त्यानंतर अवघ्या १२० सेकंदांत सर्व तिकीटांची विक्री झाल्याने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (HCA) कार्यकारी समितीच्या एका सदस्याने प्रश्न उपस्थित करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची आसन क्षमता ३९ हजारापेक्षा जास्त असूनही अनेक क्रिकेट चाहत्यांना तिकीटे मिळाली नाहीत. त्यामुळे अंतिम सामन्याच्या तिकीट विक्रीत काहीतरी गडबड झाल्याची शक्यता लोकांमधून वर्तवण्यात येत आहे.