लाहोर - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि त्यांच्या वैद्यकीय कर्मचार्यांच्या निकृष्ट वृत्तीवर टीका केली आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानचा क्रिकेट संघ इंग्लंडला भेट देणार आहे. मात्र, या दौर्यासाठी निवडलेल्या 29 सदस्यांपैकी नऊ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यात संघातील एका सहाय्यक कर्मचार्याचादेखील समावेश आहे.
इंझमाम आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, "कोरोनाग्रस्त खेळाडूंना असे वाटले असेल की पीसीबी या कठीण काळात त्यांना मदत करत नाही. माझ्या सूत्रांनी मला सांगितले आहे की पीसीबीचे वैद्यकीय कर्मचारी या खेळाडूंचे फोन उचलत नाहीत. ही वाईट वागणूक आहे."
50 वर्षीय इंझमाम म्हणाला, "मी पीसीबीला या प्रकरणाची योग्य प्रकारे दखल घेण्यास विनंती करू इच्छितो. कारण जर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर हाफिजच्या वैयक्तिक कोरोना चाचणीसारख्या घटना घडतील. कोरोनाग्रस्त खेळाडूंना घरात क्वारंटाईन करण्यापेक्षा त्यांना लाहोर येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये ठेवावे.''
इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तान 3 कसोटी आणि 3 टी-20 सामने खेळणार आहेत. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यासाठी 29 सदस्यांचा संघ निवडण्यात आला होता.