सिडनी - भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. तिसऱ्या कसोटीत रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांना दुखापत झाली होती. यामुळे ते चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातून बाहेर झाले. आता भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहालाही दुखापत झाल्याचे वृत्त असून तो देखील चौथी कसोटी खेळणार नाही. यामुळे भारतीय संघाच्या समस्येत वाढ झाली आहे.
सिडनी कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला दुखापत झाली. बुमराहची दुखापत गंभीर नसल्याचे बोलले जात होते. सामन्यानंतर त्याचे स्कॅन करण्यात आले. यात स्कॅन रिपोर्टमध्ये स्ट्रेन दिसून येत आहेत. या एबडॉमिनल स्ट्रेनमुळे बुमराह चौथ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका सुत्राने पीटीआयला सांगितले की, 'जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीत क्षेत्ररक्षण करत असाताना एबडॉमिनल स्ट्रेन झाले. त्यामुळे तो चौथ्या कसोटीत खेळणार नाही. पण मायदेशात इंग्लंड विरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बुमराह संघात असणार आहे.'
भारतीय संघ व्यवस्थापन बुमराहच्या बाबतीत कोणताही धोका घेण्याच्या तयारीत नाही. कारण भारतात होणाऱ्या आगामी इंग्लंड दौऱ्याचा विचार करुन व्यवस्थापन चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहला आराम देण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, बीसीसीआयच्या सुत्राने, मालिका २-१ ने जिंकण्याच्या आमचा उद्देश आहे. चौथ्या कसोटीला सुरूवात होण्यासाठी आणखी तीन दिवस शिल्लक आहेत. यात जर बुमराह ५० टक्के फिट झाला तर तो ब्रिस्बेन कसोटी खेळेल, असे देखील सांगितले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल, रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी हे खेळाडू दुखापतग्रस्त होऊन मालिकेतून बाहेर पडले आहेत. अशात बुमराह देखील दुखापतमुळे बाहेर झाल्याने भारतीय संघाच्या समस्येत वाढ झाली आहे.
रविंद्र जाडेजाच्या जागी शार्दुल ठाकूर तर बुमराहच्या जागी नटराजनला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. उभय संघात १५ जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे अखेरचा कसोटी सामना होणार आहे. चार कसोटी सामन्याची बॉर्डर-गावसकर मालिका १-१ ने बरोबरीत आहे.
हेही वाचा - IND vs AUS : सिडनीत ऐतिहासिक ड्रॉ, विहारी-अश्विन जोडीसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टेकले गुडघे
हेही वाचा - IND VS AUS : टीम इंडियाला आणखी एक धक्का, 'हा' खेळाडू देखील चौथ्या कसोटीला मुकला